देहूच्या मुख्य मंदिरात पार पडले दुसरं गोल रिंगण
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज देहूच्या मुख्य मंदिरात झाले. विठु नामाच्या गजरात रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान, पालखीतळावर देहू संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले. आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रिंगण सोहळ्यास दुपारी साडेबारा वाजता ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सुरवात झाली. प्रथम पताकावाले झेंडेकरी, नंतर तुळस व हंडा घेतलेल्या महिला, टाळकरी, विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केल्यानंतर मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले.
दरवर्षी इंदापूर येथे होणाऱ्या या रिंगण सोहळ्याचा मान हा अकलूज चे मोहिते पाटील आणि बाभुळ गावचे बाभुळगावकर यांच्या अश्वाला हा मान असतो.नियम आणि परंपरा जपत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. परंतु देहूच्या मुख्य मंदिरात हा सोहळा होत असल्यामुळे यावर्षी अश्वाचा मान टाळगाव चिखली मधील दत्तात्रय कोंडीबा मळेकर यांच्या अश्वाला मिळाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात भाविकांनी झिम्मा, फुगड्या, मानवी मनोरे आदी खेळांचा आनंद लुटला.