कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका; मुंबईत आढळला पहिला रुग्ण

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका; मुंबईत आढळला पहिला रुग्ण

झिका आजाराला रोखण्यासाठी नागरिकांनी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, घाबरून जावू नये; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : झिका आजाराचा एक ७९ वर्षीय रूग्ण एम पश्चिम विभागाच्या चेंबूर येथे आढळून आला होता. ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. सदर रूग्णाने खाजगी वैद्यकीय उपचार घेतले. झिका आजारावर उपचार देऊन या रूग्णाला घरी सोडण्यात आले. या रूग्णाला १९ जुलै २०२३ पासून मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला, ह्दयरोग, थॅलेसेमिया अशी लक्षणे होती. मुंबईत झिका व्हायरसचा आढळलेला हा पहिला रूग्ण आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (पुणे) यांनी सदर रूग्णाबाबतची माहिती दिली होती.

झिका व्हायरससारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांसाठी नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता डासांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. शिंदे यांनी मुंबईतील नागरिकांना आवाहन केले आहे.

झिका रोग हा झिका विषाणूच्या संसर्गामुळे होणारा सौम्य आजार आहे. झिकाचा संसर्ग हा एडिस डासांमुळे पसरतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकुन गुनिया यासारख्या आजारांचाही प्रसार करतात. विषाणूजन्य आजार असला तरीही या आजाराचा संसर्ग आणि संक्रमण कोविडसारख्या आजाराच्या वेगाने होत नाही.

लक्षणे

- ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी

- झिका हा एक स्वयं-मर्यादित आजार आहे. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्तींमध्ये लक्षणे नसतात.

- या आजाराच्या चाचणीची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेत के ई एम रूग्णालयात उपलब्ध आहे.

कार्यवाहीचा अहवाल

- बाधित रूग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये कोणताही नवीन संशयित रूग्ण आढळला नाही.

- इमारतीच्या पार्किंगमध्ये आढळणारी एडीस डास उत्पत्ती आणि डास नियंत्रण उपाययोजना केल्या जातात.

नागरिकांना आवाहन

- नागरिकांनी घाबरून जाऊ नये

- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर घट्ट झाकणांनी झाकून ठेवा.

- वापरात नसलेले सर्व कंटेनर, जंक मटेरियल, टायर, नारळाची करवंटी आदींची विल्हेवाट लावा.

- साप्ताहिक कोरडा दिवस साजरा करा. आठवडाभर पाणी असणारे सर्व कंटेनर, फुलदाणी आदी रिकामे करा.

वैयक्तिक संरक्षणासाठी

- झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी बेड नेटचा वापर करा

- दिवसा डासांपासून बचावासाठी पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा

- डास प्रतिबंधात्मक बॉडी जेलचा वापर करा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com