लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही, सोसायटीमध्येच घेता येणार लस
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईकरांना त्यांच्या सोसायटीमध्येच करोनाची लस उपलब्ध करुन दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरांमधील मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करुन लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी दिली आहे.
अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), सुरेश कलानी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, इंडस्ट्रीयल पार्क, बँका, मोठ्या कंपन्या कोणत्याही खासगी रुग्णालयासोबत टायअप करुन त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवारामध्ये लसीकरण करु शकतात, यासोबतच ते म्हणाले की, "आम्ही लसीकरणासाठी ७५ खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अर्ज येतील त्याप्रमाणे इतर रुग्णालयांनाही आम्ही परवानगी देऊ.
रुग्णालयांनी ही लसीकरण केंद्र उभारताना वाट पाहण्यासाठी रांगेत असणाऱ्यांसाठी जागा, लसीकरण, लसीकरणानंतर ऑबझर्व्हेशन एरिया यासारख्या गोष्टींबरोबर लसीकरणासंदर्भात इतर नियम पाळणे बंधनकारक अशणार आहे. ज्यांना मोफत लस हवी आहे ते बीएमसीने उभारलेल्या २२७ लसीकरण केंद्रावरुन ती घेऊ शकतात.