वारसा नोंद होणार रद्द ; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय
सतेज औंधकर|कोल्हापूर - मुलांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा यासाठी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची महसूल विभागाची परवानगी घेवून ग्रामपंचायतमधील वारसा नोंद रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे नवीन वारसा नोंद करताना मुलांकडून आईवडिलांचा सांभाळ करीनं, तसं न झाल्यास कारवाईस पात्र राहिनं, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र ही लिहून घेतलं जाणार आहे.
या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे. आईवडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगायचा पण वृद्धापकाळात आईवडिलांचा सांभाळ करायचा नाही, ही प्रवृत्ती समाजात वाढताना दिसत आहे. त्यामुळे म्हातारपणी आईवडिलांचे हाल होऊन त्यांच्यावर निराधार होण्याची वेळ येते. अशा घटनांना चाप बसावा आणि मुलांनी, आई-वडिलांचा सांभाळ करावा यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने ही नामी शक्कल लढविली आहे.