पैठण नगरीत हजारो भावकांनी केले एकनाथ भागवत ग्रंथ पारायणाचे एक मिनिट ३१ सेकंदात वाचन

पैठण नगरीत हजारो भावकांनी केले एकनाथ भागवत ग्रंथ पारायणाचे एक मिनिट ३१ सेकंदात वाचन

पैठण येथे सुरु असलेल्या ग्रंथ कौस्तुभ एकनाथ भागवत सप्ताहात आज एकनाथी भागवत ग्रंथ पारायणाचे एकाचवेळी १ हजार ८८० भाविकांनी केवळ १ मिनिट ३१ सेकंदात वाचन करुन नवा विक्रम केला आहे.
Published by :
shweta walge
Published on

सुरेश वायभट/पैठण; पैठण येथे सुरु असलेल्या ग्रंथ कौस्तुभ एकनाथ भागवत सप्ताहात आज एकनाथी भागवत ग्रंथ पारायणाचे एकाचवेळी १ हजार ८८० भाविकांनी केवळ १ मिनिट ३१ सेकंदात वाचन करुन नवा विक्रम केला आहे. एकाचवेळी पारायणाच्या ओवीचे वाचन करतांनाचा ऐतिहासिक क्षण पैठण करांसाठी अविस्मरणीय ठरला. या ऐतिहासिक पारायण वाचनाच्या विक्रमाची नोंद इंडीया वर्ड स्टार रेकॉर्ड या संस्थेने घेतली असून आयोजक नाथवंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

दि. २० नोव्हेंबर पासून ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत सुवर्ण महोत्सवानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या एक दिवस अगोदर एका अनोख्या विक्रमाची नोंद हजारो भावकांनी केली. १८ हजार महिला पुरुष भाविकांच्या हाती १८ हजार ओव्यांचे असलेले प्रत्येकी एक वेगवेगळे ओवीचे पान भाविकांनी एकाचवेळी एक मिनिट ३१ सेकंदात वाचन करुन विक्रम घडविला . यावेळी एकनाथ महाराज की जय या जयघोषाने मंडप दुमदुमून गेला होता. या विक्रमाची नोंद इंडीया वर्ल्ड स्टार रेकॉर्ड या संस्थेने घेतली असून या संस्थेचे महाराष्ट्राचे प्रतिनीधी दिपक हारके उपस्थित होते त्यांच्या विशेष देखरेखीखाली विक्रम प्रस्थापित झाला.

यावेळी नाथवंशज हरिपंडित गोसावी, सरदारबुवा गोसावी, हभप नाना महाराज काकडे, हभप विनीत महाराज गोसावी, चैतन्य महाराज गोसावी,राम महाराज झिंजुर्के,नाना महाराज काकडे, अशोक वाघ, प्रशांत आव्हाड, यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सप्ताहाचा सोमवारी दि२७ नोव्हेंबरला समारोप होत असून यानिमित्ताने किर्तन होणार असून सकाळी ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत ग्रंथाची शहरातून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक नाथवंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com