Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस; प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.
यासोबतच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेसुद्धा उपोषणाला बसले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती अंतरवाली सराटीमध्ये उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.
तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी, नागरिकांना बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.