Electric Vehicle : आता समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी
( Electric Vehicle ) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी इलेक्ट्रिक कार आणि बसेस ना मुंबई एक्सप्रेस हायवे सह सर्व प्रमुख मार्गांवर टोल माफी जाहीर केली आहे. यामुळे लोकांमध्ये या बाबतीत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार होऊन त्या द्वारे प्रदूषण नियंत्रणाचे ही काम साध्य होणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग , शिवडी न्हावा शेवा अटल सेतू सह सर्व प्रमुख रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्याचे आदेश शुक्रवारी जाहीर केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 29 एप्रिल लाच या धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र या धोरणाचा शासन निर्णय (जीआर) जारी झाला नसल्यामुळे ही योजना चालू झाली नव्हती. मात्र आता 29 दिवसांनंतर अखेर हा जिआर काढण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय हा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीकडून घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे धोरण 2030 पर्यंत लागू राहणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर दर 25 किमी अंतरावर ईव्ही चार्जिंग स्टेशन बांधणे बंधनकारक करण्याची सरकारची योजना आहे. सर्व पेट्रोल पंपांवर किमान एक ईव्ही चार्जिंग सुविधा करण्यात येणार आहे . यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) आणि वाहतूक विभाग यांच्यात एक सामंजस्य करार (MoU) केला जाईल.
प्रत्येक एसटी बस डेपो आणि स्थानकावर जलद चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शिवाय या धोरणाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकार वाहन खरेदीवर उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन रक्कम देणार आहे. दुचाकी वाहनांना 10 हजार रुपये, तीन चाकी वाहनांना 30 हजार रुपये तर चार चाकी वाहनांना 1. 50 लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येत्या 5 वर्षासाठी 1 हजार 993 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.