Acharya Devvrat : संस्कृतमधून शपथ घेतली, आता आचार्य देवव्रत यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी
थोडक्यात
महाराष्ट्राचे राज्यपाल विघमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी स्वीकारला आहे.
माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिकृत आदेश जारी करून आचार्य देवव्रत यांच्यावर ही जबाबदारी टाकली.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर नवा अध्याय सुरू झाला आहे. गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिकृत आदेश जारी करून आचार्य देवव्रत यांच्यावर ही जबाबदारी टाकली. आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे त्यांनी ही शपथ संस्कृत भाषेत घेतली.
शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आचार्य देवव्रत कालच आपल्या पत्नी दर्शना देवींसह अहमदाबादहून मुंबईत दाखल झाले. त्यांच्या साधेपणामुळे आणि सात्विक जीवनशैलीमुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत.
आचार्य देवव्रत हे जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी 2015 ते 2019 या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि अभ्यासू दृष्टिकोन यामुळेच त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या गेल्या आहेत.
मूळचे हरियाणातील रोहतक येथील असलेले देवव्रत यांच्यावर आर्य समाज व स्वामी दयानंद यांच्या विचारांचा खोलवर प्रभाव आहे. राज्यपाल होण्यापूर्वी ते कुरुक्षेत्रातील एका गुरुकुलात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हे त्यांचे ध्येय असून त्यांच्या प्रयत्नातून गुजरातमध्ये देशातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे.
आता महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील जबाबदाऱ्या सांभाळत असताना आचार्य देवव्रत यांचा अनुभव आणि कार्यशैली दोन्ही राज्यांच्या प्रशासनासाठी किती महत्त्वाची ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.