Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन उद्यापासून 'या' तारखेपर्यंत बंद राहणार
(Tuljabhavani Temple ) तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्याच्या जीर्णोद्धाराचे काम 1 ऑगस्टपासून सुरू होत असून त्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ते 10 ऑगस्टदरम्यान भाविकांना देवीचे केवळ मुखदर्शन घेण्याचीच परवानगी असेल.
तुळजापूर येथील हे प्राचीन मंदिर महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीचे आहे. रोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे दाखल होत असतात. मागील काही काळापासून मंदिराच्या गाभाऱ्यातील संरचना आणि जतनासंदर्भात चर्चा सुरू होती. अखेर पुरातत्व विभागाने आवश्यक मंजुरी दिल्यानंतर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
या कामांदरम्यान मंदिरातील सर्व धार्मिक पूजा, अभिषेक व इतर विधी पूर्ववत सुरू राहणार आहेत, मात्र गाभाऱ्यातील दर्शन काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवीचे मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे.
गाभाऱ्यातील काम दहा दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर भाविकांना पूर्वीप्रमाणे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल. अशी माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.