आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्षाला प्रवेश

आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्षाला प्रवेश

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्षाला प्रवेश
Sakinaka Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

मुंबईतील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक डॉ. प्रमोद नाईक, विद्यालंकार तंत्रनिकेतनचे प्राचार्य आशिष उकिडवे, उपप्राचार्य वर्षा भोसले, तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते आहे. दि. १ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदविका प्रवेशाच्या नियामावलीस मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता १० वी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आज दि. २ जून २०२२ रोजी सुरु करण्यात आली आहे.

पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

पदविका प्रवेशात प्रतीवर्षी १० टक्क्यांनी वाढ

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम इत्यादी कार्यक्रमांद्वारे पदविका अभ्यासक्रमांच्या अध्यापकांनी व संस्थांनी सकारात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मागील तीन वर्षात पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात प्रतीवर्षी सलग १० टक्के याप्रमाणे वाढ होत आहे.

केंद्रीभूत प्रवेशाच्या ३ फेऱ्या होणार

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या २ फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या घेण्यात येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी २ जागा राखीव

कोविड- १९ महामारीदरम्यान आई व वडील गमावलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम केअर्स योजना सुरू केली आहे. राज्य शासनाने पदविका अभ्यासक्रमाकरिता या योजनेअंतर्गत कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संस्थेतील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोन या प्रमाणात अधिसंख्य जागा उपलब्ध राहणार आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या स्वनाथ योजनेअंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे लोकार्पण

तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ वर्ष २०१५ पासून dtemaharashtra.gov.in या URL वर कार्यरत होते. इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार यांच्या धोरणानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ dte.maharashtra.gov.in वा URL वर उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन व अद्ययावत संकेतस्थळाचे पुनः लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी भाषांतरण (Marathi Version): संचालनालयाच्या संकेतस्थळावर माहिती इंग्रजी व मराठी भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला /पालकांना व विद्यार्थ्यांना संचालनालयाची व त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती सहजतेने मराठीमध्येही उपलब्ध होईल. संचालनालयाची माहिती अधिक विद्याकेंद्रित, उपयोगी आणि सर्वासाठी वापरण्याकरिता सहज करण्यात आली आहे.

विभाग निहाय संस्थांची यादी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी व जनतेसाठी संचालनालयाच्या विविध विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या संस्थांची यादी दर्शवण्यात आली आहे. विद्यार्थी ही माहिती सहजरित्या बघू शकतील व याचा फायदा त्यांना प्रवेशाच्यावेळी संस्था निवड करण्यासाठी होईल.

शिष्यवृत्ती योजनांची, प्रवेशासंबंधीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता पदविका प्रवेशाच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत.प्रथम वर्ष पदविका (१०वी नंतर)-http://poly22.dte.maharashtra.gov.in प्रथम वर्ष पदविका (१२वी नंतर)- https://phd22.dte.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com