हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले

हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले

Published by :
Published on

हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख भाजपासदस्यांनी आपल्या भाषणात केला होता. त्याबद्दल आभार मानत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे स्मरण करून दिले आणि हिंदुत्व आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, असे भाजपाला सुनावले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या नीट सुरू ठेवण्याची सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान फडणवीस यांनी ही सूचना केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या चर्चेला उत्तर दिले. बाबरी मस्जिद पाडली तेव्हा, 'येरे गबाळे' पळून गेले. बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की, बाबरी मस्जिद पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर, मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. हे आहे हिंदुत्व. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

तुम्ही 2014ला आम्हाला फसवले. तेव्हाही आम्ही हिेंदूच होतो. आताही निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता. ज्या खोलीत हे ठरले, ती बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे. हेच का तुमचे बाळासाहेबांबद्दलचे प्रेम? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिर उभे राहात आहे आणि आता राम मंदिरासाठी हे घरोघर पैसे मागत फिरत आहेत. असे असले तरी ते आमच्यामुळे होते आहे, असे त्यांना दाखवायचे आहे, असा निशाणा साधतानाच संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारांना मांडीवर घेतले आणि काश्मीरमध्ये पीडीपीसोबत मांडीला मांडी लावून सत्ता भोगली, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवालही त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com