Dasara Melava 2025 : राज्यात आज 5 दसरा मेळावे; कोणत्या घोषणा केल्या जाणार, सर्वांचे लक्ष
थोडक्यात
आज वेगवेगळ्या पक्षांचे दसरा मेळावे राज्यात होणार
राज्यात आज 5 दसरा मेळावे
कोणत्या घोषणा केल्या जातात याकडे लक्ष
आज वेगवेगळ्या पक्षांचे दसरा मेळावे राज्यात होणार आहेत.नवरात्रौत्सवात 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे होणार आहे. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलतात, कोणती घोषणा करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासोबतच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे यंदा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या वर्षी त्यांचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता. आता मात्र त्यांच्या मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले असून तो यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. त्यामुळे यावेळच्या दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तसेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ही बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावर होणार आहे. सकाळी 11वाजता या मेळाव्याची सुरुवात होणार आहे.
यासोबतच दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केले जाते. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होते.
तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा बीडमधील नारायणगडावर होणार आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील काय बोलतात, कोणती मोठी घोषणा करतात याकड सर्वांचे लक्ष लागले आहे.