Uddhav Thackeray Meet Raj Thackeray : गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन करुन निमंत्रण
मुंबईत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. माहिती अशी की, राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही दीड दिवसांचा गणपती विराजमान होणार असून, त्यासाठी उद्धव ठाकरे यांना खास निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्या सकाळी 10 ते 11 या वेळेत गणपती स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत.
राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन करून आमंत्रण दिल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंनीही ते निमंत्रण स्वीकारल्याने, ठाकरे कुटुंब एकत्र गणेशोत्सव साजरा करणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर संध्याकाळी खासदार संजय राऊत देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दर्शनाला हजर राहणार आहेत.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे. 5 जुलै रोजी दोघे एकाच व्यासपीठावर दिसले होते, तर 27 जुलैला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या भेटीगाठींमुळे दोन्ही पक्षांच्या संभाव्य जवळिकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अनेक वर्षांनंतर कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठाकरे घराण्याचे समर्थक आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. या भेटीचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.