उल्हासनगरचा ‘चांदनी डान्सबार’ अखेर कायमचा सील!
मयुरेश जाधव, अंबरनाथ
थर्टी फर्स्टला उल्हासनगरमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगरचा प्रसिद्ध असा चांदनी डान्सबार थेट सील करण्यात आलाय. उल्हासनगर महापालिकेनं ही मोठी कारवाई केलीये.
उल्हासनगरच्या १७ सेक्शन परिसरात चांदनी नावाचा डान्सबार अनेक वर्षांपासून सुरू होता. कोरोनाच्या काळातही सरकारी नियम न पाळता बिनधास्तपणे या बारमध्ये छमछम सुरू होती. या बारमध्ये आजवर अनेकदा स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं धाड टाकली होती आणि इथे अश्लील नृत्य चालत असल्याचा भांडाफोड केला होता. इतकंच नव्हे, तर आजवर या डान्सबारवर तब्बल ८० वेळा पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही या बारच्या लीला काही कमी होत नव्हत्या.
त्यामुळे मध्यवर्ती पोलिसांनी थेट हा बार सील करण्याचा गोपनीय अहवाल उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना ६ डिसेंबर रोजी पाठवला होता. त्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या पथकानं ऐन थर्टी फर्स्टला या बारला सील ठोकलं आहे त्यामुळे उल्हासनगरच्या डान्सबार लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर शहरात आजच्या घडीला १२ ते १५ डान्सबार सुरू आहेत. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त डान्सबार हे एकट्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी कितीही साळसूदपणाचा आव आंत असले, तरी शेवटी चांदनी बारवरील कारवाई का केली? याची कारणं याच अधिकाऱ्यांना उत्तर मिळण्यासाठी पुरेशी ठरतील.