अन क्षणाचाही विलंब न करता मंत्री कराड यांनी फ्लाईटमध्ये केले उपचार;प्रवासी बचावला

अन क्षणाचाही विलंब न करता मंत्री कराड यांनी फ्लाईटमध्ये केले उपचार;प्रवासी बचावला

Published by :
Published on

सचिन बडे | केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड विमान प्रवास करत असताना एक प्रवासी अचानक तब्येत बिघडल्याने खाली पडला. याची माहिती मंत्री कराड यांना मिळताच सर्व सरकारी प्रोटोकॉल बाजूला सारीत त्या व्यक्ती जवळ जाऊन तातडीने प्राथमिक उपचार केले. परिणामी आपत्कालीन उपचाराने प्रवाशाचा जीव वाचला आहे. डॉक्टर साहेबांच्या या सेवेमुळे सर्वच विमानातील प्रवासी अचंबित झाले.

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार डॉ. भागवत कराड हे राजकारणात येण्याअगोदर डॉक्टर होते. रुग्णासेवा करता करता त्यांनी राजकारणात प्रवेश केला परंतु रुग्णांप्रती असलेली सेवा देण्यासाठी आजही ते कायम तयार असतात. मग ते अपघातादरम्यान जखमीला रुग्णालयात नेण्यापुर्वीचा उपचार असो किंवा आपत्कालीन उपचार असो.

इंडिगो फ्लाइट क्रमांक 171 ने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे दिल्ली ते मुंबई विमान प्रवास करीत होते. विमानामध्ये प्रवाशांची संख्याही मोठी होती. बारा क्रमांकावरील आसनावर असलेल्या व्यक्तीस अचानक पणे रक्तदाबचा त्रास सुरू झाला त्यानंतर, तो प्रवासी चक्कर येऊन पडला. ही बाब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ विमानामध्ये रुग्णां जवळ धाव घेऊन तपासणी केली आणि प्रथमोपचार उपचार सुरू केले. डॉ. साहेब स्वतः जातीने प्रथमोपचार करीत असल्याने या घटनेने इतर प्रवासी अचंबित झाले. डॉ. भागवत कराड हे  वैद्यकीय शास्त्रात निष्णात बाल रोग तज्ञ डॉक्टर आहे त्यामुळे त्यांनी आपला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवीत रुग्णांवर ताबडतोब औषध उपचार सुरू केले. त्यामुळे रुग्णास एका अर्थाने दिलासा मिळाला.

विमानातील एका प्रवाशावर आपत्कालीन उपचार दिल्यानंतर मंत्री कराड यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्तुतीसुमने उधळण्यात येत आहेत. तसेच त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com