“…तोपर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही”- अनिल देशमुख

“…तोपर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही”- अनिल देशमुख

Published by :
Published on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत. मात्र इतके समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. "माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com