Mumbai Vaccination । मुंबईत शुक्रवारपासून घरोघरी लसीकरण; ‘या’ नागरिकांनाच प्राधान्य

Mumbai Vaccination । मुंबईत शुक्रवारपासून घरोघरी लसीकरण; ‘या’ नागरिकांनाच प्राधान्य

Published by :
Published on

मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व वॉर्डात म्हणजे अंधेरी, जोगेश्वरी परिसरात उद्यापासून अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही लसीकरण मोहीम राबवली जाईल. त्यासाठी प्रोजेक्ट मुंबई या सेवाभावी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणासारखे उपक्रमही महानगरपालिकेने राबवले आहेत. आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अश्या व्यक्तींना त्यांच्या घरीच जावून कोविड लस देण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य शासनाने देखील संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

अशी करा नोंदणी

दरम्यान आतापर्यत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता, 4466 व्यक्तींची नावे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे त्यांचे उद्या शुक्रवारपासून लसीकरण होणार आहे. अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे. व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रं देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्रं संबंधित व्यक्ती/नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com