आईने मंगळसूत्र आणि जोडवे मोडले, शिक्षणासाठी मुलाने इंग्लंड गाठले

आईने मंगळसूत्र आणि जोडवे मोडले, शिक्षणासाठी मुलाने इंग्लंड गाठले

तीन विद्यापीठाकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्या आहेत.

गोपाल व्यास | वाशिम : हालाखीची परिस्थिती गरिबीशी दोन हात करत उन्हा-तान्हात नाशिकमध्ये बांधकाम मजूर म्हणून केलेलं काम आणि पोटाला चिमटा घेऊन मुलाच्या शिक्षणासाठी एका बापाने केलेली धडपड या क्षणाला कामी आल्याचं पाहायला मिळाले. होय वाशिम जिल्ह्यातील पेडगावच्या विमल आणि गणेश सोनोने या दांपत्याचा मुलगा आता ब्रिटनला शिक्षणासाठी जातोय. त्याला वेगवेगळ्या तीन विद्यापीठाकडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप मंजूर झाल्या आहेत.

आईने मंगळसूत्र आणि जोडवे मोडले, शिक्षणासाठी मुलाने इंग्लंड गाठले
Video : गेट ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांकडून योगदिन साजरा

वैभव सोनोने असे या हरहुन्नरी तरुणाचं नाव असून तो चक्क ब्रिटनला शिक्षणासाठी चालला आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी आपल्या जीवच रान केलं आहे. एक वेळ घरात खायलाही काही नसले तरी चालेल मात्र मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं कमी पडू द्यायची नाहीत हेच वैभवच्या आई-वडिलांचे ध्येय होते आणि वैभवनेही अभ्यासात कधी कुचराई केली नाही व त्याचाच परिणाम म्हणून आता वैभवला चेनविंग अवॉर्ड ही शिष्यवृत्ती युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये पर्यावरण व विकास याविषयी अभ्यासासाठी तर कॉमनवेल्थ शेयर्ड स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स मध्येच अभ्यासासाठी आणि कॉमनवेल्थ शेयर्ड स्कॉलरशिप युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंग्लिया यामध्ये शेती आणि ग्रामीण विकास याविषयी अभ्यासासाठी मंजूर झाली आहे. तो लवकरच उच्चशिक्षणासाठी ब्रिटनला जाणार आहे.

वैभव हा लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. याला सुरवातीपासूनच विदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न होत. आणि त्याच स्वप्न पूर्ण होत असल्याने आज त्याच आनंद गगनात मावेनासा झालाय. वैभव याचे सुरुवातीचे शिक्षण हे संत सखाराम महाराज संस्थान लोणी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात झालेय. तिथल्या शिक्षकांनी वैभव मधलं टॅलेंट हेरलं आणि त्याच्यासाठी शाळेच्या ग्रंथालयाची दारं २४ तास उघडी केली. तो तासन तास ग्रंथालयात घालवायचा.आणि अभ्यास करायचा व वाचनातून त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत झाल्या आणि त्याने पुढचं आयुष्य आर्थिक, सामाजिक दुर्बलतेने मागासलेल्यांसाठी घालवण्याचे निश्चित केलं.

वैभव हा एवढ्यावरच थांबला नाही. तर उच्च शिक्षणासाठी पुणे गाठलं आणि फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए केलं. मात्र यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला घरची परिस्थिती इतकी हालाखीची होती की पुण्यासारख्या शहरात दोन वेळच्या जेवणाची सोय होणही शक्य नव्हत. काही दिवस त्याने मित्रांकडे, नातेवाईकांकडे घालवले आणि नंतर वस्तीगृहात प्रवेश मिळवला. मात्र जेवणाचा प्रश्न होताच. मुलगा उपाशीपोटी झोपतोय हे समजल्यावर आईने आपलं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र आणि पायातील चांदीचे जोडवे मोडले आणि त्याला जेवणासाठी पैसे पाठवले. ज्यातून दोन-तीन महिन्याची त्याची सोय झाली पण पुढचा प्रश्न होताच. शिक्षकांना जेव्हा ही त्याची परिस्थिती समजली तेव्हा त्यांनी काही दिवस त्याच्या जेवनाची सोय केली. पण वैभवला खरा मदतीचा हात मिळाला तो ठाण्याच्या विद्यादान सहाय्यक मंडळाकडून. नावाप्रमाणेच शिक्षण घेणाऱ्यांना मदत करणाऱ्या ह्या संस्थेने वैभवच्या जेवणाचा खर्च उचलला आणि त्याचं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालं.

पुढे वैभवने बेंगलोर गाठलं आणि तेथील अजीम प्रेमजी विद्यापीठातून एम ए डेव्हलपमेंट हे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच नोकरी करून शिक्षण घ्यावं हे अनेकांनी वैभवला सुचवलं होतं त्याने तसा विचार वडिलांकडे बोलून दाखवला. मात्र, वडिलांनी त्याला ठामपणे आपल्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी सांगितलं. वडिलांचे म्हणणं होतं आपल्या घरातील अठरा विश्व दारिद्र्य हे पिढ्यानपिढ्या आम्ही सोसतोय पुढचे चार-पाच वर्ष यात आणखी बदल झाला नाही तरी फारसा फरक पडणार नाही मात्र तू आपल्या शिक्षणावरचे लक्ष विचलित होऊ देऊ नको.

यावर सामाजिक विषयात शिक्षण घेतलेल्या वैभवने प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली आणि त्याला साथ मिळाली प्रदान या संस्थेची ही संस्था देशभरातील अति मागास भागात आदिवासी गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करते. या संस्थेत वैभव सध्या मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अतिदुर्गम गावात आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करत आहे. वैभव या गावात गेल्यापासून या गावचं रूपच पालटलं आहे. आधी या गावात पिण्यासाठी पाणी नव्हतं, शेती ही कोरडवाहू होती. रोजगार नसल्याने लोक मोठ्या प्रमाणात गाव सोडून शहरात स्थलांतर करायचे. आता मात्र वैभव आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाने गाव पुन्हा समृद्ध होत आहे. वैभवने रोजगार हमीच्या कामात होणारा भ्रष्टाचार थांबवलाय, जलसंधारणाची विविध कामे करून शेती सिंचनाखाली आणली आहे.

परगावात असताना आपले आई-वडील आणि समाजाचे दुःख बघितलेल्या वैभवने अशाच वंचित, दुर्लक्षित लोकांसाठी कार्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःचे आयुष्य वाहूनघेतले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तो आता ब्रिटन येथे शिक्षण घेणार असून वैभवला मंजूर झालेली स्कॉलरशिप मिळवण्यासाठी एकलव्य या संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम या अंतर्गत मोठी मदत झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com