Vasai Politics: 'वसईमध्ये भाजपही मियां-बीबी चालवलेली पार्टी', भाजपवर शेखर धुरींचा जोरदार हल्लाबोल
बहुजन विकास आघाडी तर्फे वसई येथे आयोजित करण्यात आलेला कार्यकर्ता संवाद मेळावा अत्यंत आक्रमक आणि उत्स्फूर्त पार पडला. या मेळाव्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.कार्यक्रमात बोलताना शेखर धुरी यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार शब्दांत टीका केली. “मी गेली ४० वर्षे भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र आज तिकीट वाटपात जुने, निष्ठावान कार्यकर्ते बाजूला सारले जात आहेत. आणि काल-परवा आलेल्या लोकांना डोक्यावर बसवले जात आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला. यावेळी धुरी यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना म्हटले.
“आज वसईत भाजप ही मियां–बीबी चालवलेली पार्टी झाली आहे. सर्व निर्णय मोजक्याच लोकांच्या हातात असून सामान्य कार्यकर्त्यांना कुठलाही सन्मान उरलेला नाही,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली. ते पुढे म्हणाले, “निवडून दिल्यानंतर आम्हालाच वाऱ्यावर सोडण्याचे काम भाजप नेतृत्व करत आहे. म्हणून मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फज्जू व अविनाश समाधान फाउंडेशन ग्रुपने मला बहुजन विकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला. माझ्या कार्यकर्त्यांनीही तोच कौल दिला आणि त्यामुळेच आज मी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे.”
“आज मी प्रभाग क्रमांक २६ मधून निवडणूक लढवत आहे आणि हे फक्त आणि फक्त आप्पांमुळे शक्य झाले आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे जाहीर कौतुक केले. हितेंद्र ठाकूर यांच्या विकासकामांचा उल्लेख करत धुरी म्हणाले, “वसईला पाणी आणण्याचे काम आप्पांनी केले, विकासाची दिशा आप्पांनी दिली. मात्र त्या कामांचे श्रेय आज भाजप घेत आहे. प्रत्यक्षात गेल्या एक वर्षात भाजपकडून एकही नवे काम झालेले नाही.
खोट्या श्रेयवादाने जनतेची दिशाभूल केली जात आहे.” यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. “आता वसईत खऱ्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी बहुजन विकास आघाडीच लढणार,” असा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या आक्रमक संवाद मेळाव्यामुळे वसईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडी निर्णायक भूमिका बजावणार, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजपचे मनोज शर्मा यांनी आपल्या जवळपास ६० कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. “शेखर धुरी यांच्यावर झालेल्या अन्यायामुळेच आम्ही बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेतला आहे,” असे मनोज शर्मा यांनी यावेळी सांगितले.
