Vidarbha Rain Update
Vidarbha Rain Update

Vidarbha Rain Update : विदर्भातील 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा कहर; अनेक मार्ग ठप्प, पिकांचे प्रचंड नुकसान

विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सलग दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Vidarbha Rain Update) विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सलग दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाण्यातील डोणगाव येथे कांचनगंगा नदीला पूर आल्याने मुंबई-नागपूर महामार्ग 3 तास ठप्प होता. मेहकर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. केवळ मेहकर तालुक्यातच 67 ते 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, यवतमाळ व तेलंगणच्या अदिलाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे इसापूर व सातनाला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी पैनगंगा व वर्धा नदीला पूर आला असून, कोरपना, चंद्रपूर तालुक्यातील अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. कोरपना-गांधीनगर, जेवरा-गाडेघाट, पिपरी-मूर्ती यांसह अनेक मार्ग बंद होते. धानोरा-भोयगाव पुलावरून पाणी वाहिल्याने शेकडो वाहनांची गर्दी झाली.

यवतमाळ जिल्ह्यातील 28 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, उमरखेड, पुसद व महागाव तालुके सर्वाधिक बाधित झाले आहेत. या जिल्ह्यातील 14,736 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहुरला गेलेले भाविकही धनोडा पुलावर पाणी आल्याने अडकून पडले होते.

अमरावती जिल्ह्यातील 18 गावांतील 321 घरांची पडझड झाली असून, 3920 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या सर्व परिस्थितीत कापूस, सोयाबीन व तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com