Ambadas Danve : माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल; अंबादास दानवे म्हणाले...
(Ambadas Danve) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच्याआधी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते.आता या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, " राज्यात एकीकडे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. काही भागांमध्ये बोगस बियाण्यांमुळे आणि अवकाळी पावसामुळे जवळपास 97 हेक्टरवर नुकसान झाले असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमी खेळताना गुंतलेले दिसताय, त्यांना रमी खेळायची असेल तर त्यांना घरदार आहे, परंतु सभागृहात रमी खेळणं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं. यावरून राज्य सरकारची असंवेदनशीलता किती आहे हे स्पष्ट होतंय. मुळात असे लोक मंत्रिमंडळात आहेत हेच दुर्दैव आहे.
"ही यांची पहिलीच घटना नाहीये. कधी 'ओसाड गावची पाटीलकी' म्हणतात, कधी 'ढेकळ्यांचा पंचनामा' करायचं म्हणतात, कधी 'कर्ज घेऊन साखरपुडे करता' म्हणतात, आणि आता रमी खेळतात. मला वाटतं अशा प्रकारचे कृषीमंत्री मंत्रिमंडळात असणं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मजबुरी असावी.अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे.शेतकऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतीलच, पण त्याआधी सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. अशा मंत्र्याला घरीच बसवायला पाहिजे. घरीच काय ते रमी खेळायचं, मग घरात 24 तास रमी खेळा."
"सभागृह हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असतं, त्यावर काम करण्यासाठी असतं. त्यामुळे अशा मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे. मंत्रिमंडळात त्यांना एकही मिनिट राहण्याचा अधिकार नाही.” असे अंबादास दानवे म्हणाले.