Virar Politics: विरार पूर्वेला भाजपला मोठा धक्का, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा बविआमध्ये पक्षप्रवेश
विरार पूर्व येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट न मिळाल्याने आणि पक्षाकडून दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करत बहुजन विकास आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. शुक्रवारी विरार पूर्वेतील भाजपा पदाधिकारी नानू सुभाष आणि मिलिंद वैद्य यांच्यासह त्यांच्या पत्नींनी बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात उपस्थित राहून औपचारिक पक्षप्रवेश केला.
त्यांच्यासोबत फुलपाड्यातील शेकडो कार्यकर्त्यांनीही एकत्रितपणे पक्षप्रवेश केला असून, येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने आणि अनेक वर्षे समर्पित काम केल्यावरही तिकीट वाटपाच्या वेळी वगळण्यात आल्यामुळे ही नाराजी वाढली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू असताना, भाजपात राहून त्यांच्यासाठी काम करण्यापेक्षा थेट बहुजन विकास आघाडीत येऊन प्रत्यक्ष काम करणे श्रेयस्कर ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
