गादी उचलायला गेले अन् आढळला विद्यार्थ्यांचा मृतदेह; आश्रमशाळेतील खळबळजनक घटना

गादी उचलायला गेले अन् आढळला विद्यार्थ्यांचा मृतदेह; आश्रमशाळेतील खळबळजनक घटना

कारंजा तालुक्यातील एका आश्रमशाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भूपेश बरंगे|वर्धा: कारंजा तालुक्यातील एका आश्रमशाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. नारा येथील स्व.यादवराव केचे आश्रमशाळेत तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून शिवम सनोज उईके असं १३ वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. शिवम अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील राहणारा होता. शिवमचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता शिवम शेवटचा दिसला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इतर विद्यार्थी झोपण्याची तयारी करत होते. गाद्या काढण्यास सुरुवात केली असता एका गादीखाली शिवमचा मृतदेह विद्यार्थ्यांना सापडला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना याची माहिती दिली. शिक्षकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर या घटनेची माहिती समजताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणाचा कसून तपास करण्यास सांगितले आहे.

नागपूर येथे शवविच्छेदनेला पाठविला मृतदेह

मृतकाच्या नातेवाईकांनी कारंजा येथील ग्रामीण रुग्णलायात शवविच्छेदन करण्यास नकार दिला, शवविच्छेदनची व्हिडिओग्राफी व्हावी व नागपूर येथे शवविच्छेदन करावे या मागणीसाठी नातेवाईकांनी जोर धरला. यावेळी काही काळ ग्रामीण रुग्णालय व आश्रम शाळेत तणावपूर्ण वातावरण होते. त्या मृतकवर शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवण्यात आला आहे.

मृतदेह प्रकरणात कोणावर होणार कारवाई?

आश्रम शाळेत दिवसभरापासून विद्यार्थी बेपत्ता होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी कोणाला याची कल्पना आली नसावी. शाळेतील विद्यार्थी दिवसभरापासून कुठे गेला याची थोडी विचारणा केली नसावी. हा प्रश्न आहे. रात्री झोपण्याची तयारी सुरू असताना ही घटना उघडकीस आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. येथील वसतिगृह अधीक्षक, शिक्षक करतात तरी काय? असा प्रश्न आदिवासी बांधवानी केला.

रक्षाबंधन कार्यक्रमात सर्वच व्यस्त

स्व.यादवराव केचे आदिवासी आश्रम शाळा काल रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमात व्यस्त असल्याने या घटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com