आणखी 7 दिवस मान्सूनचे वारे; हवामान खात्याचा अंदाज
मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही. कोकण, गोव्यात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल.

