Shravan Somvar : आज पहिला श्रावण सोमवार; महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?
( Shravan Somvar ) राज्यात अनेक ठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे. या दिवशी शिवमंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात येतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात पूजा,अभिषेक आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.
संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महादेवाला शिवामूठ अर्पण करून भक्तगण श्रावणाच्या सोमवारांमध्ये आपली श्रद्धा व्यक्त करतात.
शिवामूठ अर्पण ही श्रावण महिन्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पवित्र मानले जाते. या प्रक्रियेत प्रत्येक श्रावणी सोमवारी विशिष्ट धान्य महादेवाला अर्पण केले जाते. यंदा श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरु झाला असून 23 ऑगस्ट 2025 रोजी समाप्त होणार आहे. या कालावधीत एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत, यातलाच पहिला श्रावणी सोमवार आज आहे.
कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ?
पहिला श्रावणी सोमवार –
शिवामूठ : तांदूळ
तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. श्रावणातील पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ अर्पण करून भक्तगण आपले जीवन शुद्ध, शांत आणि सात्त्विक ठेवण्याचा संकल्प करतात.
दुसरा श्रावणी सोमवार –
शिवामूठ : तीळ
तीळ हे पवित्रता, पापनाशकता आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे. तीळ अर्पण केल्याने पापांचं क्षालन होतं, असं धर्मशास्त्रांमध्ये म्हटलं आहे. शरीरातील दोष व मनातील कलुषता दूर होते, अशी श्रद्धा आहे.
तिसरा श्रावणी सोमवार –
शिवामूठ : मूग
मूग हे आरोग्य, ताजेपणा आणि सत्वगुणाचं प्रतीक मानलं जातं. मूग अर्पण केल्याने शरीर सुदृढ राहते आणि मन प्रसन्न होतं. जीवनात शांती टिकवण्याचा संदेश यातून दिला जातो.
चौथा श्रावणी सोमवार –
शिवामूठ : जव
जव म्हणजे समृद्धी, कष्टाचं फळ आणि परिश्रमाचे यश. शेवटच्या श्रावणी सोमवारी जव अर्पण करून भक्तगण आपल्या जीवनात परिश्रमाने प्राप्त होणाऱ्या यशासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना करतात.