‘मोठ्या साहेबांच्या ड्रॉवरमधून ‘ते’ पत्र चोरताना अजितदादांसोबत भाजपाची कोण कोण लोकं होती?’

‘मोठ्या साहेबांच्या ड्रॉवरमधून ‘ते’ पत्र चोरताना अजितदादांसोबत भाजपाची कोण कोण लोकं होती?’

Published by :
Published on

अजित पवारांनी ५४ आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी 'आ बैल मुझे मार' असेच केले आहे. अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत 'टॉर्च'चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे (BJP) कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा अशी मागणी करत शिवसेनेनेही चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्या वादात उडी टाकली आहे. एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर 'लेटर बॉम्ब' टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

तसेच अजित पवारांचे ते पत्र हा भाजप व अजित पवारांतील गुप्त करार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा होता. पण पाटलांनी अकारण भांडाफोड करून आपण भविष्यात मोठे राजकारण करण्यास सक्षम नसल्याचे दाखवून दिले. गोपनीय गोष्ट घडली व त्यातून यश प्राप्त झाले नाही तरी त्या गोपनीयतेचा हा असा बोभाटा होणे योग्य नाही. पण भडकलेल्या चंद्रकांत पाटलांनी एका तिरमिरीत पहाटेच्या शपथविधीचे सर्व गुप्त कट लोकांसमोर आणले आहेत. पण त्यांच्या भांडाफोडीत इतरही अनेक कंगोरे आहेत असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मात्र त्यांचे मन त्या पहाटेच्या गुंत्यातून बाहेर पडू देत नाही. राजकारणातील गुंत्यात इतके अडकून पडणे बरे नसते, पण पाटलांना हे सांगायचे कोणी! पाटील यांनी आता असा स्फोट केला आहे की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांनी जे ५४ आमदारांच्या सहीचे पत्र भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केले तो एक मोठा घोटाळा आहे.

हे पत्र अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरले. हे असे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला आहे. पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे. राजकारणात व युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो. त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते.

अजित पवार यांनी पवारांच्या डॉवरमधून पत्र चोरले हा आरोप निव्वळ भंपक आहे. ५४ आमदारांच्या सहीचे पत्र अजित पवारांना चोरण्याची आवश्यकता नाही. जेव्हा पहाटेचे हे उद्योग सुरू होते तेव्हा अजित पवार हे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेच होते व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे असणारच. ते चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com