आमची घरे का दाखवली नाहीत? अजित पवारांच्या दौऱ्यानंतर कोल्हापुरात नागरिकांमध्ये जुंपली
कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यात पाहणी करुन, शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली आणि पंचगंगा नदीवरील पुलाची पाहणी केली. या दौऱ्यानंतर पाहणी केलेल्या परिसरात स्थानिकांमध्ये वाद पाहायला मिळालं. 'आमची घरे का दाखवली नाहीत?' असा सवाल करत पुढे पुढे करणाऱ्यांना पूरग्रस्त नागरिकांनी जाब विचारला. कोल्हापूरमध्ये शाहूपुरी परिसर पाचव्या गल्लीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. नुकसानीची पाहणी न केल्याने पूरग्रस्त नागरिक प्रचंड संतप्त आहेत.
गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठं नुकसान झालं. अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. कालच ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवार यांनी रस्ते मार्गे सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.
शिरोळमध्ये पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ जि. कोल्हापूर येथील जनता हायस्कूल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

