Koyna Dam : कोयना धरणातील पाणी आता मुंबईकडे वळवणार? पाटबंधारे विभागाकडून प्राथमिक तपासणी सुरू
कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या सुमारे 67 टीएमसी पाण्याचा उपयोग मुंबईसाठी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने प्राथमिक तपासणी सुरू केली आहे.
कळंबस्ते गावाजवळ वाशिष्ठी नदीच्या काठावर दिल्लीतील एका संस्थेमार्फत मृदा व भूगर्भ चाचण्या करण्यात आल्या असून, यावर आधारित पूर्व अहवाल तयार केला जाणार आहे.
सध्या वीजनिर्मितीनंतरचे हे पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत सोडले जाते व थेट समुद्रात मिसळते. हेच पाणी मुंबईला पुरविण्याच्या दृष्टीने सुमारे 160 कि.मी. लांबीच्या जलवाहिन्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 38 कोटी रुपये खर्चून व्हॅसकॉम कंपनीमार्फत हवाई सर्वेक्षणही झाले आहे.
या प्रकल्पासाठी वाप्कोस लिमिटेड (नवी दिल्ली) व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेबाबत कोलाड पाटबंधारे विभागाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्राद्वारे माहिती दिल्याचे येथील सरपंचांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेबाबत कोलाड पाटबंधारे विभागाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्राद्वारे माहिती दिल्याचे येथील सरपंचांनी सांगितले.