Mumbai Cha Raja New record : मुंबईच्या राजाच्या नावावर जागतिक विक्रम : ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स’चा मानाचा मुकुट
Global Book Of Excellence : मुंबईच्या राजाचा यंदाचा गणेशोत्सव ऐतिहासिक ठरला आहे. ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मुंबईच्या राजाच्या मंडळाचा जागतिक विक्रम म्हणून गौरव करण्यात आला आहे.
मुंबईच्या राजाच्या मंडळाने 1977 पासून सलग 48 वर्षे सर्वात मोठी गणेश मूर्ती उभारण्याची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. या परंपरेची सातत्यता, भक्तिभाव आणि श्रद्धेचं दर्शन पाहून ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स’ने हा विक्रम अधिकृतपणे नोंदविला आहे. त्यामुळे मुंबईतलं पहिलं गणेश मंडळ म्हणून हा बहुमान मुंबईच्या राजाच्या नावावर नोंदवला गेला आहे.
याचबरोबर, मुंबईच्या राजाला यावर्षी जगातील सर्वात मोठा आणि सर्वात वजनदार सोन्याचा हार अर्पण करण्यात आला. हा हार खास करून भक्तांनी प्रेम, श्रद्धा आणि भक्तीभावातून साकारला असून, त्याचं वजन आणि वैभव पाहून तोदेखील विश्वविक्रमाच्या यादीत नोंदविण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक गर्दी करतात. दरवर्षी गणेश मंडळ आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे, भव्य सजावटीमुळे आणि भक्तिभावाने केलेल्या आयोजनामुळे प्रसिद्ध आहे. मात्र, यंदाचा गणेशोत्सव विक्रमांच्या शिखरावर पोहोचल्यामुळे मुंबईच्या राजाचं वैभव जागतिक स्तरावर अधोरेखित झालं आहे.