छेडछाडीच्या भीतीने तरुणीची धावत्या रिक्षातून उडी; तरुणी गंभीर जखमी
औरंगाबादमध्ये रिक्षाचालक छेडछाड करत असल्यानं तरुणीनं धावत्या रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तरुणीच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या आहेत. सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान ही घटना घडली. रिक्षाचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जालना रोडवर मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी रिक्षामध्ये बसली. ती एकटीच रिक्षात होती.संबंधित चालकाने रिक्षा सुरू केली. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली. तिने त्या रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितलं. परंतु तो रिक्षा अजूनच वेगाने घेऊन जाऊ लागला. शेवटी घाबरून त्या तरुणीने धावत्या वेगवान रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली. परंतु रिक्षातून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
रिक्षातून बाहेर उडी घेतलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली. यावेळी काही तरूणांनी तिच्या घरच्यांशी संपर्क साधला. मुलीच्या पालकांना तातडीने तिथे बोलावून घेतले. रिक्षाचालकाला तिथे जमा झालेली गर्दी दिसली व त्यामधून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो रिक्षा चालक लगेचच तिथून पळून गेला.त्यांनी मुलीस तातडीने जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. तिच्यावर उपचार करून नातेवाईकांनी घरी नेले.