Nashik : नाशिकमध्ये साधूंच्या वेशात येऊन महिलेला भुरळ घालून 20 हजारांचा ऐवज घेवून पसार
( Nashik ) नाशिकच्या सातपूर-अंबड लिंक रोड परिसरात साधूंच्या वेशातील तिघांनी आमिष दाखवत महिलेला भुरळ घालून घरातील ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
10 ऑगस्टच्या दुपारी पाटील पार्कजवळील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत तिघे भामटे साधूच्या वेषात आले. त्यांनी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने एका महिलेशी संवाद साधला. त्यानंतर ‘दीक्षा’ घेतल्यास आयुष्यात कल्याण होईल, असे सांगितले.
सुरुवातीला 500 रुपयांची मागणी केली, त्यानंतर “एक किलो तूप मागवले”, “चहा द्यावा” अशा मागण्यांनी घरातील सदस्यांना व्यस्त ठेवले. या दरम्यान त्यांनी महिलेच्या हातावर ‘रक्षा’दोरा बांधला. महिलेच्या घरातील सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज त्यांनी चोरून नेला आणि तात्काळ पसार झाले. काही वेळानंतर त्या महिलेला तिची फसवणूक झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच तिच्या पतीने एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. गजबजलेल्या भागात भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.