Nashik : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात उच्च न्यायालयात आव्हान; नाशिकस्थित मधुकर जगतापांची वकीलामार्फत जनहित याचिका, आज सुनावणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik ) नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून अनेक साधू-महंत येत असतात त्यांच्या निवासासाठी तपोवनामध्ये साधुग्राम नगरी वसविली जाते. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे.
परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील १८०० झाडांची कत्तल करण्याच्या सरकार व महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेवर आज सुनावणी ठेवली आहे.
नाशिकस्थित मधुकर जगताप यांनी वकील पायल वर्धन आणि ओमकार वाबळे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली असून याचिका न्यायप्रविष्ट असेपर्यंत १८०० झाडे तोडण्यास प्रतिवादींना मज्जाव करावा, झाडे तोडण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि साधुग्राम उभारणीसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या आहेत.
