Praful Lodha : प्रफुल्ल लोढांविरोधात अत्याचारप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(Praful Lodha) हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेल्या प्रफुल लोढांविरुद्ध पुण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बावधन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या ताज्या तक्रारीमुळे आधीच खळबळजनक स्वरूप घेतलेल्या प्रकरणात नव्या आरोपांची भर पडली आहे. प्रफुल्ल लोढांवर यापूर्वी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, धमकी आणि ‘हनी ट्रॅप’ प्रकाराचा आरोप होता. संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्यावर पोक्सो कायद्यासह बलात्कार, फसवणूक, खंडणी यांसारखे गुन्हे दाखल झाले आहेत. साकीनाका पोलिसांनी त्याला 5 जुलै रोजी अटक केली होती आणि तो सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.
दरम्यान, नवा गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झाला आहे. कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेने बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, लोढाने तिच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून 27 मे रोजी रात्री बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमकावले. विरोध केल्यावर तिच्या नोकरीवर गदा आणण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.
या प्रकरणी 17 जुलै रोजी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, लोढांविरोधात बलात्कार व धमक्यांचा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.