Ahilyanagar Crime : आधी श्रीगोंद्याचा तलाठी आणि तरुणीही बेपत्ता, नंतर खोल दरीत दोघांचे मृतदेह सापडले, नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात एका पुरुष आणि तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) यांचा समावेश आहे.
दोघे काही दिवसांपासून बेपत्ता होते. रामचंद्र पारधी यांच्या बेपत्तापणाबाबत त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, तर रूपालीच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.
स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास रिव्हर्स वॉटरफॉलजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची कार आणि कड्याजवळ आढळलेल्या चपलांमुळे संशय बळावला. रविवारी (22 जून) शोध मोहीम सुरू झाली, मात्र खराब हवामानामुळे थांबवावी लागली. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह सुमारे 1200 फूट खोल दरीतून बाहेर काढले.
शवविच्छेदनासाठी मृतदेह श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.