Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी
(Pune Metro ) पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या पाच किलोमीटरच्या प्रस्तावित मार्गिकेवर आणखी दोन स्थानकांची भर पडणार आहे. याआधी मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या स्थानकांना हिरवा कंदील मिळाला होता. मात्र, नागरिकांकडून बिबवेवाडी आणि बालाजीनगर येथे स्थानकांची मागणी होत होती. अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दोन स्थानकांना मान्यता देण्यात आली.
ही घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक आणि शहरी विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पुणेकरांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
दरम्यान, पुणे–लोणावळा उपनगरी रेल्वेमार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. यामुळे औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक विकासाला गती मिळणार असून, वाढत्या वाहतूक कोंडीवरही उपाय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.