Pune : पुण्यात परदेशी महिलेकडून साडेसात कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त
( Pune ) पुणे-मुंबई-बेंगळुरू महामार्गावर अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे विभागाने एका परदेशी महिलेकडून सुमारे ३.८१५ किलो मेथाम्फेटामिन जप्त केले असून, या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्ये सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही महिला दिल्लीहून बेंगळुरूकडे खासगी बसने प्रवास करत होती. गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली. पुणे सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने मुंबई-बेंगळुरू महामार्गावर संबंधित बसवर नजर ठेवण्यात आली.
महिलेची तपासणी करण्यात आली असता सुरुवातीला सामानात संशयास्पद काहीही आढळले नाही. मात्र बसची सखोल झडती घेतल्यानंतर मागील बाजूस लपवलेली एक अतिरिक्त पिशवी सापडली. त्या पिशवीत सलवार-सूट ठेवलेले होते आणि प्रत्येक कपड्याच्या पट्ट्यामध्ये पारदर्शक आवरणात पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ सापडला.
प्राथमिक तपासणीत या पदार्थाचे स्वरूप 'मेथाम्फेटामिन' असल्याचे निष्पन्न झाले असून, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित परदेशी महिलेला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज तस्करी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.