Pune Metro : पुणे मेट्रोचा चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत विस्तार; केंद्र सरकारची मान्यता
(Pune Metro ) पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत वानाज–रामवाडी मार्गाचा विस्तार चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंत करण्यात येणार असून, केंद्र सरकारने या योजनेला अधिकृत मंजुरी दिली आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली.
हा प्रस्तावित विस्तार दोन उन्नत मार्गांचा असून, एकूण 12.75 किलोमीटर अंतरात 13 स्थानके उभारली जाणार आहेत. हे मार्ग चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोलीसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या उपनगरांना जोडतील. प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, आगामी चार वर्षांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
या कामासाठी सुमारे 3626 कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो केंद्र व राज्य सरकार मिळून उचलणार आहेत. या विस्तारामुळे पुणे शहराच्या पूर्व–पश्चिम भागांतील सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे. तसेच हे नवीन मार्ग विद्यमान मेट्रो लाईन-1 (निगडी–कात्रज) आणि लाईन-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी 'डिस्ट्रिक्ट कोर्ट' स्थानकावर जोडले जातील, ज्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या मार्गांमध्ये सहजपणे प्रवास करता येईल.
या मार्गांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते IT पार्क, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक भाग आणि रहिवासी वस्त्यांना सहजपणे जोडतील. शिवाय, चांदणी चौक येथे मुंबई आणि बेंगळुरु येथून येणाऱ्या बससेवा, तर वाघोली येथे औरंगाबाद आणि अहमदनगरहून येणाऱ्या बसेसना मेट्रोशी जोडण्याची योजना आहे.
या योजनेमुळे पौड रोड आणि नगर रोडवरील वाहतूक दाटी कमी होईल आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळेल. यामुळे दररोजच्या प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 2027 मध्ये ही संख्या सुमारे 96000 तर 2057 पर्यंत ती सुमारे 3.5 लाखांपर्यंत जाईल.