Pune : पुणे पुस्तक महोत्सवात पहिला विश्वविक्रम; ' लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स ' हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये प्रस्थापित
अमोल धर्माधिकारी, पुणे
(Pune) पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला 'लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स ' हा विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये प्रस्थापित करून, भारतातील बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न पुण्यात झाला आहे. आकाशात फुगे सोडून या विश्वविक्रमाचा पुणेकरांनी आनंद व्यक्त केला.
हा विश्वविक्रम खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला अभिवादन करणारा ठरल्याचे मत तज्ज्ञांनी पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात उद्या 13 डिसेंबर पासून होत आहे.
या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजासाठी थोर काम केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी लाखो आदिवासी शब्दांच्या साहाय्याने पोस्टर प्रदर्शित करून, विश्वविक्रम जाहीर करण्यात आला आहे.
