Pune Airport : पुणे विमानतळावरून लवकरच 15 मार्गांवर विमानसेवा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
(Pune Airport) पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की,पुण्याहून देशातील आणखी 15 नव्या शहरांसाठी लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार आहे.पुण्यातून सध्या 37 शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे.
नव्या मार्गांसाठी केंद्र सरकारने 15 स्लॉट मंजूर केले असून, त्यावर आवश्यक नियोजन सुरु आहे. लवकरच हे मार्ग निश्चित होऊन विमानसेवा सुरू होईल,असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.या सेवांमुळे पुणेकरांना अधिक प्रवास पर्याय उपलब्ध होतील आणि देशाच्या विविध भागांशी जोडणी अधिक सुलभ होईल.मोहोळ यांनी सांगितले की, “पुणे हे औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीचा विस्तार ही सरकारची प्राथमिकता आहे. नव्या विमानसेवांमुळे व्यवसाय, शिक्षण व पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल.”
नव्या मार्गांमध्ये जयपूर, श्रीनगर, गुवाहाटी, देहरादून, रांची, जबलपूर, अमृतसर, सूरत, वडोदरा, कोझिकोड, त्रिवेंद्रम, भुवनेश्वर आणि मोपा (गोवा) यांसारख्या शहरांचा समावेश होण्याची शक्यता आहे.काही विद्यमान मार्गांवरील सेवा देखील वाढवली जाण्याची शक्यता आहे.
सध्या लोहगाव विमानतळावरून दररोज सुमारे 200 विमानांची ये-जा होते, तर जवळपास 35 हजार प्रवासी दररोज येथून प्रवास करतात. त्यामुळे ही वाढती कनेक्टिव्हिटी पुण्याच्या एकंदर सामाजिक आणि आर्थिक विकासाला मोठा हातभार लावेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.