Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ; माळीण परिसरात जोरदार पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे डिंभे धरण आणि माळीण परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा मोठा प्रभाव मुख्यत: माळीण भागात दिसून आला असून, तेथील प्रमुख रस्ता पाण्याखाली गेला आहे. परिणामी, वाहतूक ठप्प झाली आहे.
या हवामानामुळे माळीण परिसरातील सुमारे 11 गावांचा मुख्य संपर्क तुटलेला आहे. डिंभे धरणाच्या परिसरात नवीन पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर असताना, त्या जागी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसामुळे हा पर्यायी मार्ग देखील जलमय झाला आहे.
परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. बचावकार्य आणि आपत्कालीन व्यवस्था सक्रिय करण्यात आली असून स्थानिक प्रशासन सतर्क आहे.
तसेच, बारामती आणि इंदापूर परिसरातही आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.