Sinhagad Fort : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! सिंहगड किल्ला उद्या पर्यटकांसाठी राहणार बंद
(Sinhagad Fort ) पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
29 मे रोजी होणाऱ्या आपत्ती निवारण पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी पर्यटकांसह ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांना किल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कल्याण दरवाजा, आतकरवाडी व इतर सर्व मार्गांवरून किल्ल्यावर जाणे पूर्णतः प्रतिबंधित असेल.
वनविभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सिंहगड परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी उद्या 29 मे रोजी किल्ल्यावर जाणे टाळावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.