Pune : "शांतता... पुणेकर वाचत आहेत" उपक्रमात 7.5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग
अमोल धर्माधिकारी, पुणे
वाचनाची चळवळ सक्षम करण्यासोबतच पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यासाठी राबविण्यात आलेल्या "शांतता... पुणेकर वाचत आहेत" या उपक्रमाला पुणेकरांनी प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुस्तक वाचन करून, छायाचित्र अपलोड करीत विश्वविक्रमाकडे वाटचाल केली. हजारो नागरिकांनी पुस्तक वाचन करून आपले छायाचित्र वेबसाइटवर अपलोड केले. या वाचन उत्सवात १७ ते २२ वयोगटातील युवकांची संख्या सर्वाधिक होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळा, महाविद्यालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक, धार्मिकस्थळे, सार्वजनिक वाचनालय, सरकारी आणि खाजगी आस्थापने, आयटी कंपन्या, अशा सर्वच ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे आवडीची पुस्तके वाचत होते. नागरिकांनी पुस्तक वाचतानाचे छायाचित्र काढून ते पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत तयार केलेल्या लिंकवर अपलोड केले.
सर्वांनी अपलोड केलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हे वाक्य तयार करून त्याचा 'गीनेस बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात येणार आहे.
