Chandrabhaga River : Pandharpur Heavy Rain : पंढरपुरात पूरसदृश्य परिस्थिती; उजणी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग
( Chandrabhaga River ) आषाढी वारी फक्त अकरा दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढल्यामुळे ही खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सध्या उजनी धरणातून 35000 क्युसेस आणि वीर धरणातून 15000 क्युसेस पाणी सोडण्यात आले असून, चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रातील अनेक मंदिरे जलमय झाली असून, परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या नदीतून 25000 क्युसेस पाणी वाहत असून, आणखी 50000 क्युसेस पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वारीसाठी आलेले हजारो वारकरी सध्या पंढरपूरात दाखल होत असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीकाठी स्नान करणाऱ्या वारकऱ्यांना प्रशासनाने पाण्यात उतरण्यास मनाई केली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाव चालवणाऱ्यांना लाइफ जॅकेट्स देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रेस्क्यू बोट्स मधून प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सतत सूचना देत असून, कोणताही वारकरी पाण्यात उतरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिक व वारकऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत नदीपासून दूर राहण्याचे व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.