Pune : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; अनुचित प्रकार टाळण्यासाठी आठ हजार पोलीस तैनात
( pune ) आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आज आणि उद्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील. या पालखी सोहळ्यादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
ज्ञानेश्वर माउलींची पालखी 22 जून रोजी सासवड येथे मुक्कामी असेल. या पार्श्वभूमीवर 22 जूनच्या पहाटे 2 वाजल्यापासून ते 24 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे जाणारी दिवेघाट व बोपदेव घाट मार्गे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत पुणे ते सासवड जाणारी वाहतूक खडी मशीन चौक – कात्रज – कापूरहोळ मार्गे वळविण्यात येईल. सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे – खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येईल.
तसेच, 24 व 25 जून रोजी पालखी जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे. यासाठी 24 जूनच्या पहाटे 2 वाजल्यापासून ते 25 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत पुणे ते सासवड – जेजुरी – वाल्हे – नीरा मार्गावरील वाहतूक बंद राहील. वाहतूक झेंडेवाडी – पारगाव मेमाणे – सुपे – मोरगाव – नीरा मार्गे वळविण्यात येईल. पालखी मार्गावरील नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.