Pune Hinjewadi : हिंजवडी आयटी पार्कमध्ये वीज पुरवठा खंडित, मोठ्या कंपन्यांना फटका
(Pune Hinjewadi ) पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात उच्चदाब भूमिगत वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे सुमारे 52000 ग्राहक आणि 70 ते 90 आयटी व आयटीईएस कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 220 केव्ही इन्फोसिस–पेगासस केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हिंजवडी फेज-2 मेट्रो स्थानकाजवळील वीजपुरवठा थांबला. परिणामी, पुणे ग्रामीण व गणेशखिंड विभागातील वीज ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागला.
महावितरणने तातडीने उपाययोजना करत टप्प्याटप्प्याने लो-टेन्शन ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गांनी पूर्ववत केला आहे. मात्र, उच्चदाब वीजग्राहकांना वीज मिळण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार असून, पूर्ण वीजपुरवठा बुधवार सकाळपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
रहिवासी संघटनांच्या मते, काही गृहनिर्माण सोसायट्यांचे बॅकअप यंत्रणाही संपुष्टात आल्या असून, पाण्याचा पुरवठा आणि लिफ्टसारख्या मूलभूत सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) या संघटनेने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे पर्यायी वीजयंत्रणेच्या उभारणीची मागणी केली आहे. “राजीव गांधी आयटी पार्कसारख्या महत्वाच्या औद्योगिक भागांमध्ये वीजबंदीमुळे उद्योगांचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.