Pune : पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यानं घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी
(Pune) औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर गुरुवारी एका 61 वर्षीय नागरिकाचा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशिनाथ काळे असे असून ते दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात गाडीचा तोल गमावला.
गाडी घसरल्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्या क्षणी मागून भरधाव आलेल्या कारने त्यांना चिरडले. अपघात इतका गंभीर होता की त्यांनी घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असून, स्थानिकांत खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून खड्डे हे अपघातांचे मुख्य कारण ठरत असताना उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे.
या भीषण घटनेनंतर नागरिकांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली असून केवळ पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.