Pune : जुन्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला, युवक गंभीर जखमी
(Pune) पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून झेड ब्रिजजवळ एका युवकावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. हल्लेखोरांनी केवळ हल्ला करून थांबले नाही, तर परिसरातील दोन गाड्यांचीही तोडफोड केली. अचानक घडलेल्या या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुना वादातून झेड ब्रिज परिसरात पीडित युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी युवकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून, लवकरच आरोपींचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
हा हल्ला पूर्वीच्या वादातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, संपूर्ण तपासानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.