Pune : पुण्यातील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेचा मोठा निर्णय; 'पीएमसी रोड मित्र'ॲप, नागरिकांना थेट तक्रार करता येणार
( Pune ) पुणे शहरातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची माहिती थेट महापालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे महापालिकेने 'पीएमसी रोड मित्र' नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. नागरिकांना या ॲपच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवता येणार असून महापालिका प्रशासन त्यावर तात्काळ कारवाई करणार आहे.
खड्ड्यांची संख्या आणि अपूर्ण दुरुस्तीमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा महापालिकेच्या पथ विभागाकडे तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नाही. अशा तक्रारींना आळा बसावा म्हणून हे ॲप तयार करण्यात आले आहे.'पीएमसी रोड मित्र' या ॲपद्वारे नागरिक दोन-तीन फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात. फोटोमध्ये जीपीएस स्थान (अक्षांश-रेखांश) समाविष्ट असल्यामुळे खड्ड्याचे ठिकाण अचूकपणे ओळखले जाईल. ही माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाकडे आपोआप पाठवली जाईल. नोंद झाल्यावर कनिष्ठ अभियंता त्या जागी जाऊन खड्डा बुजवेल व केलेल्या कामाचे फोटो पुन्हा त्या तक्रारीस जोडेल. यामुळे तक्रारदारास पूर्वी आणि नंतरची स्थिती स्पष्टपणे दिसून येईल.
या ॲपच्या वापरामुळे विभाग प्रमुखांना संपूर्ण शहरातील तक्रारी, त्यावर झालेली कारवाई, कोणत्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली किंवा दुर्लक्ष केले याचा तपशीलवार आढावा घेता येणार आहे.सध्या हे ॲप अँड्रॉइड फोनसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे.पुणेकरांना रस्त्यावरील खड्ड्यांविषयी थेट तक्रार नोंदविण्याचा एक प्रभावी पर्याय म्हणून हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.