Pune : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर
(Pune) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया गतीमान झाली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी (ता. 22) प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. यामध्ये 41 प्रभाग निश्चित करण्यात आले असून, नगरसेवकांची संख्या 165 इतकी असणार आहे. चार सदस्यीय प्रभागरचना बहुतेक ठिकाणी ठेवण्यात आली असून, प्रभाग क्रमांक 38 हा पाच सदस्यीय असेल. नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 3 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत दिली आहे.
निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार केंद्रांची आखणी, अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच आवश्यक मनुष्यबळाच्या नियोजनास सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत नगररचनाकार, संगणक तज्ज्ञ आणि संबंधित अधिकारी यांचा सहभाग होता.
2011 च्या जनगणनेच्या आधारे ही रचना करण्यात आली असून, 2017 प्रमाणेच याहीवेळी चार सदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. 2022 मध्ये पुणे महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणुका रखडल्या होत्या. आता नव्या प्रभागरचनेनंतर 2025 ची निवडणूक होणार आहे.