Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा
(Pune Rain ) पुणे शहरात आज सकाळपासूनच आभाळ भरून आलेले असून, वातावरण ढगाळ राहिले आहे. दुपारी पावसाने जोर धरल्याने शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळू लागल्या. खडकवासला परिसरासह काही धरण क्षेत्रांतही जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
कामावर जाणाऱ्या नागरिकांना पावसामुळे अडथळ्यांना सामोरे जावे लागले. अनेकजण रेनकोट किंवा छत्रीशिवाय घराबाहेर पडल्याने ओलेचिंब झाले. शहरातील दत्तवाडी, कात्रज, स्वारगेट आणि दत्तवाडीसारख्या प्रमुख भागांमध्ये वाहतूक मंदावली आहे. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
प्रशासनाने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने पुण्यासह काही इतर जिल्ह्यांसाठीही पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.